अनुवाद : स्वरूप आणि संकल्पना
जागतिक दृष्टीकोनातून विचार केला तर आपल्या असे लक्षात येते कि, वेगवेगळ्या देशात राहणा-या लोकांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, भौगोलिक परिस्थिती भिन्न असते. सांस्कृतिक, सामाजिक जीवन भिन्न असते. माणसाला परस्परांचे जीवन, संस्कृती, परंपरा, ज्ञानसंपदा इ. जाणून घेण्याची उत्सुकता असते. या उत्सुकतेपोटी माणूस त्या त्या ठिकाणच्या साहित्याचा अभ्यास करतो, परंतु भाषेच्या अडसरामुळे ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत मार्ग असतो तो अनुवादाचा वेगवेगळ्या भाषेतील व्यक्त झालेले विचार अनुभव व भावना या गोष्टीच्या आदानप्रदाना साठी अनुवाद हा मुख्य स्त्रोत आहे. विविध भाषेतील ज्ञान भांडार समजून घेण्यासाठी त्या भाषेतील साहित्याचा अनुवाद होणे गरजेचे आहे.
भारतातील विविध भाषेतील उत्तमोत्तम ग्रंथाचे अनुवाद करण्यासाठी केंद्रशासनाने उपक्रम राबविले आहे. त्याच मुळे हिंदी, बंगाली, गुजराती, तमिळ, कन्नड, तेलगु, मराठी इ. भाषेतील साहित्याचा आपल्याला परिचय झाला तसेच अनुवादामुळे पाश्चात्य साहित्य ही भारतीय लोकापर्यंत पोहचले.
भारतीय भाषांचा अनुवादाचा विचार केला तर पहिल्यांदा आपल्याला विविध संस्कृतीची परंपरा समजावून घेणे आवश्यक आहे. अनुवाद करताना समाज संस्कृती आणि बोली या घटकांचा परिचय होतो. कोणत्याही साहित्यातून त्या त्या प्रदेशाची संस्कृती प्रतिबिंबित होते. साहित्याच्या केंद्रस्थानी संस्कृती असते.
अनुवाद : अर्थ आणि व्याख्या.
अनुवाद हा तत्सम शब्द आहे. अनु + वद म्हणजेच “वद” धातूला “अनु” उपसर्ग लागून हा शब्द बनवला आहे, याचा व्युत्पत्तीमूलक अर्थ पुन्हा बोलणे TRANSLATION या शब्दाला मराठीमध्ये भाषांतर आणि हिंदीमध्ये अनुवाद या संज्ञा आहेत. ट्रान्सलेशन या शब्दाची उत्पत्ती लॅटिन भाषेत सापडते. Trans या शब्दाचा अर्थपूर्ण (Across or Beyond – पलीकडे दुसऱ्या ठिकाणच्या किवा स्थितीत) आणि Lation या शब्दाचा अर्थ घेऊन जाण्याची क्रिया म्हणजेच एका भाषेतील मजकूर दुसऱ्या भाषेत घेऊन जाण्याची क्रिया असा अर्थ होतो.
- अनुवादाची व्याख्या
पूर्वी मर्यादित स्वरुपात अनुवाद केले जायचे. आता मात्र जीवनाच्या सर्व व्यवहारामध्ये सर्रास वापर केला जातो. अनुवाद या शब्दाच्या अर्थाचा अभ्यास करताना अनुवादाच्या वेगवेगळ्या भाषेतील व्याख्या अभ्यासणे गरजेचे आहे.
- “विधी विहितस्या नुवचनमनुवाद:” न्यायसूत्र
- “ज्ञातस्य कथनमनुवाद:” जैमिनीय ज्ञानमाला
- “अनुवाद वह द्वद्वात्मक प्रक्रिया है l जिसमे स्त्रोत पाठ की अर्थ संरचना (आत्मा) का लक्ष्य पाठ की श़ैलीगत संरचना (शरीर) द्वारा प्रस्थापित होता है l – जी गोपीनारायण
- “एक भाषा मे व्यक्त विचारों को लक्ष भाषा मे तथा संभव अपने मूल रूप मे लाने का प्रयास करता है l – डॉ. भोलानाथ तिवारी
- “ मूळ वस्तूतील सर्वच्या सर्व अभिप्राय प्रसादयुक्त वाणीने सांगणे”. श्री. म. माटे
- “आदर्श अनुवाद कृती ही मूळ साहित्य कृतिशी फार इमान राखून बांधलेली किवा फार दूर गेलेली मोकळी असू नये आशयाची समानता साधणारा अनुवाद अधिक स्वीकारार्य ठरते. – डॉ. द. भि. कुलकर्णी
- भाषांतर ही संहितेची एका भाषिक – सांस्कृतिक आवरणातून दुसऱ्या भाषिक आवरणातून, दुसऱ्या भाषिक आवरणात स्थानांतर करणारी द्वैभाषिक प्रक्रिया आहे. भाषांतर म्हणजे एका भाषेतील, वाक्यातील अर्थ दुसऱ्या भाषेतील वाक्यामध्ये जसाच्या तसा आणणे – भालचंद्र नेमाडे
- “Translation is the replacement of tertual Materialin one language (Source Language) by equivalent tertual Material another language (Target Language)” I.C. Catford
- Nida – Translating consists in producing in the recpeter language The ciasest natural equivalent to the message of the source language First in meaning and secondly in style” याने शैलीला महत्व दिले.
- Translation is the transference of the content of text from one language in to another, bearing in mind that we can note always dissociate the content from the from” – Foressten
उपरोक्त व्याख्यांचा अभ्यास करताना असे जाणवते की, एकही व्याख्या अनुवादाच्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण अशी नाही प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने व्याख्या करण्याचा प्रयत्न करतो. अनुवाद ही एक व्यापक संज्ञा आहे आणि भाषांतर त्याच्यात सामावणारी संज्ञा आहे.
अनुवाद करताना भाषेत व्यक्त झालेले विचार दुसऱ्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करणे होय. – डॉ. द.भि. कुलकर्णी यांच्या मतानुसार अनुवाद मूळ साहित्य कृतींशी जास्त प्रमाणात दिलेली किवा फार दूर गेलेली असू नये. तर श्री.म.माटे म्हणतात की मूळ साहित्य कृतीत सर्वच्या सर्व अभिप्राय अनुवादित साहित्य कृतीत सांगावे. पाश्चात्य मीमासंक Nida शैलीला महत्व देताना दिसतो.
उपरोक्त सर्व मीमासांकानी केलेल्या व्याख्या उत्कृष्ट आहेत. त्याचा परामर्श घेताना अनुवादाचे स्वरूप हळूहळू उलगडत जाते.
- संकल्पना आणि स्वरूप
अनुवादाचा अर्थ म्हणजे एका भाषेतील कलाकृती दुसऱ्या भाषेत नेणें एवढाच नाही तर मूळ कलाकृती सामाजिक, ऐतिहासिक ,राजकीय वातावरणाची निर्मिती असते त्याच जाणिवेने ती अनुवादित करावी लागत असते. रोमन काळापासूनच अनुवाद संकल्पनेचा विकास झालेला आहे. एरिक याकोबसन यांच्या मतानुसार भाषांतर करणे ही रोमन लोकांनी शोधलेली कला आहे. तर सिसेरी होरॅस यांनी अनुवाद संकल्पनेचा विचार केला आहे.
अनुवाद करताना ब-याचदा वाक्यरचनेत नव्याने बदल करावे लागतात. सम मूल्यांकाचा आधार घेत अनुवादकाला आपले कार्य यशस्वीपणे सिद्ध करावे लागते ही वस्तुस्थिती आहे. भाषेत भाव जाणिवाचे रचना तंत्र वेगळे असते. प्रत्येक भाषेत भाव जाणिवाचे अनेक रूपबंध असतात आणि त्यांची स्वतःची वैशिष्ट्येही असतात. विशिष्ट रचना आणि प्रणाली यामुळे भाषेची एक विश्व धारणा निर्माण होत असते या सर्वांचा समावेश अनुवाद संकल्पनेत होत असतो. जॉर्ज स्टेनर या अभ्यासकाने “आफ्टर बायबल” या ग्रंथामध्ये अनुवाद संकल्पनेचे विश्लेषण केले.
अनुवाद ही भाषा विज्ञानाची एक शाखा आहे. एका भाषेचा दुस-या भाषेशी असलेला संबध शोधण्यासाठी अनुवाद कला आवश्यक आहे. भाषा मधील समानता तसेच त्यातील फरक यांची माहिती अनुवादामुळे मिळते. अनुवादाला आधुनिक जीवनामध्ये सामाजिक ,राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक अशा सर्वच क्षेत्रामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक रूप प्राप्त झाले आहे. साहित्यातील अनुवादाने संस्कृती समृद्ध होते.
प्र. ना. परांजपे म्हणतात, अनुवाद म्हणजे मौखिक किवा लिखित भाषेच्या माध्यमातून एकदा व्यक्त झालेल्या आशयाची त्याच भाषेचा किँवा दुसऱ्या एखाद्या भाषेच्या माध्यमातून पुन्हा केलेली मौखिक किवा लिखित अभिव्यक्ती होय.
डॉ. कल्याण काळे म्हणतात, “पूर्ण सिद्ध मजकूराचे स्पष्टीकरण विवरण अथवा विस्तार म्हणजे अनुवाद होय.” दात्यांच्या शब्द कोशात पुन्हा पुन्हा सांगणे. पाठ करणे, स्पष्ट करणे असा अर्थ सांगितला आहे.
अनुवाद ही दोन संस्कृती मधील अंतरक्रिया असते तशीच ती दोन भाषामधील अंतरक्रिया असते. त्या भाषांपैकी ज्या भाषेतल्या मजकुराचा अनुवाद करायचा त्या भाषेला मूळ भाषा अथवा स्त्रोत भाषा (Source language) म्हणतात. तर ज्या भाषेत अनुवाद करायचा तिला लक्ष्य भाषा (Target Language) म्हणतात. प्रत्येक भाषेला एक परंपरा असते आणि त्या भाषेतील साहित्यात ज्ञान भांडाराचे संचित असते त्यामुळे अनुवाद करणे म्हणजे एखाद्या साहित्य कृतीचे शब्दशः भाषांतर करणे नव्हे तर मूळ साहित्य कृती मधील सांस्कृतिक, सामाजिक, वातावरण विचार आणि भाव भावना दुसऱ्या भाषेतील वाचका पर्यंत पोहचविणे होय.
मराठी साहित्याच्या संदर्भात चंद्रशेखर जहागीरदार यांची अनुवाद मीमांसा ही तौलानिक साहित्य अभ्यासक असणारी प्रमुख संकल्पनात्मक घटना आहे असे मानले तर तौलानिक साहित्यचे हिंदी अभ्यासक नरेश गुहा यांनी तौलानिक भाषांतराचा समावेश करता येईल असे म्हटले आहे. त्यामुळे तौलानिक साहित्याची एक शाखा म्हणून अनुवादाचा विचार केला जात होता. १९५८ साली पाश्च्यात्य देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात तौलानिक साहित्य अभ्यासकांमध्ये जागतिक साहित्यांचा आस्वाद घेण्याच्या संदर्भात भाषांतर ही संकल्पना पुढे आली आहे असे अभ्यासकांनी नमूद केले आहे. एका भाषेतील साहित्याचा अन्य भाषिकांनी आस्वाद घ्यायचा असला तरी तो भाषांतरा शिवाय शक्य नाही. (वसंत डहाके २०११/२१८) अशा स्वरुपात अनुवाद संकल्पना पुढे आली असली तरी भाषांतर मीमांसा ही स्वतःच एक ज्ञान शाखा असून ती तौलानिक साहित्य अभ्यासकांची एक शाखा नव्हे किवा भाषा विज्ञानाचे ही विशिष्ट असे अभ्यास क्षेत्र नव्हे. तिचे स्वतःचे असे व्यापक आणि व्यामिश्र असे अभ्यास क्षेत्र आहे. (वसंत आबाजी डहाके २०११.२९५) असेही स्पष्ट झाले. तौलानिक साहित्य अभ्यासक क्षेत्रा बरोबरच अनुवादाचा संबध हा शैली विज्ञान, भाषा विज्ञान आणि वाड्मय इतिहास ,सौंदर्य शास्त्र ,चिन्ह मीमांसा या ज्ञानशाखांशी आहे. तौलानिक साहित्याच्या अभ्यासात समान संस्कृती आणि भाषा यांचा विचार साहित्याच्या संदर्भात केला जातो. अनुवादामध्ये स्त्रोत भाषेतील साहित्य कृतीचा लक्ष्य भाषेतील साहित्य कृतीवरील प्रभाव महत्वाचा ठरत असतो. तौलानिक साहित्य अभ्यासात भाषांतर प्रक्रियेचा विचार केलेला नसतो. या कारणाने भाषांतर मीमांसेला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले.
भाषेच्या अनेक बाजूचा विचार करणारे भाषा विज्ञान अनुवादाच्या क्षेत्रामध्ये महत्वाचे ठरते. साहित्य कृतींचा भाषा वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करताना अनुवादकाला प्रामुख्याने भाषेचे संज्ञापनाचे कार्य लक्षात घेऊनच भाषिक संरचनेला हात घालावा लागतो. अनुवाद वाक्यांश आशयानुसार व लक्ष्य भाषेत आकृत्रिम ठरते आहे का हे पहिले जाते. भाषा विज्ञानात अर्थाला महत्व असल्याने अनुवाद करताना व्यंग्यार्थ सूचन करणारे घटक स्वतः योजना, वृत्ती योजना, वाक्य रचना नादानुवतित्व इत्यादी घटकाचा विचार करावा लागतो.
यावरून अनुवाद मीमांसेचे क्षेत्र व्यापक स्वरूपाचे आहे हे लक्षात येते. अनुवाद करताना मूळ भाषेतील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आचार – विचार, अर्थ, भावना या सगळ्यातच सहजता आली पाहिजे या घटकांचा विचार अनुवादाच्या स्वरुपामध्ये केला आहे.
अनुवाद म्हणजे पूर्वी केलेल्या कृतीचीच पुनरावृत्ती करणे. आज आपण पाहिले तर सर्वत्र अनुवाद आणि भाषांतर या संज्ञा एकाच अर्थाने वापरल्या जातात परंतु असे करणे चूक आहे अनुवाद हा दोन प्रकारचा असू शकतो उदा. मल्लीनाथाची टीका हा योग वसिष्ठात्मक तयार झालेला आहे. हा भाषिक अनुवाद तर प्राकृत ग्रंथाच्या संस्कृत छाया, रामायण, महाभारताची निरनिराळ्या भाषामधून झालेली रुपांतरे. महाभारताची गीते वरील टीका म्हणजे ज्ञानेश्वरी हा अनुवाद भिन्न भाषिक अनुवाद सांगता येईल अनुवादाला मोठी परंपरा आहे. जगातल्या भाषेमध्ये उत्तोमोत्तम साहित्य आज उपलब्ध आहे.
सारांश
मूळ भाषेतील साहित्य कृतीचा साध्य भाषेत अनुवाद करणे म्हणजे एका सांस्कृतिक संदर्भातील अनुवादाला अर्थासह दुसऱ्या समूहाला नव्याने ओळख करून दिली जाते. दोन समान भौगोलिक परिस्थितीने एकमेकांपासून दूर असते तरी अशा आविष्कारांच्या माध्यमातून मूळ कलाकृती अनुवादका मार्फत वाचका पर्यंत पोहचविली जाते. साध्य भाषा आणि मूळ भाषा जर एकाच देशातील असतील तर सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीत फार भिन्नता आढळत नाही , परंतु परकीय भाषेत अनुवाद करताना भिन्नता आढळते.
अनुवादित साहित्याचा स्वातंत्र्योत्तर काळातील साहित्याच्या तौलानिक अभ्यासामुळे विशेष महत्व प्राप्त झाले. जगाच्या पाठीवर अनेक भाषा बोलल्या जात असल्याने मानवाने जीवन व्यवहारात त्रिभाषा सूत्रीचा स्वीकार केला आहे. माणसाने देश काळ ,भाषा यांच्या सीमा ओलांडून निर्माण केलेला विचार इतरांपर्यंत पोहचविणे हे अत्यंत महत्वाचे कार्य अनुवादामुळे घडलेले आहे. मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्राचा विकास करायचा असेल तर अनुवाद अतिशय महत्वाचा आहे. जागतिक पातळीवर गाजलेली पुस्तके मराठीमध्ये लवकर अनुवादित होताना दिसतात. संस्कृतीचे आदान प्रदान या घटकामुळे अनुवाद महत्वाचे ठरते.
संदर्भ ग्रंथ
- काळे, कल्याण सोमण अंजली सेवा भाषांतर मीमांसा प्रतिमा प्रकाशन पुणे प्रथम आवृत्ती १९९४
- गोपीनाथजी, अनुवाद सोच और संस्कार, पृष्ठ क्र ९ .
- परांजपे प्र.न. मराठी वाङ्मय कोश खंड चौथा संपादक विजया राज्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळ मुबई १४
- माटे श्री. म. विवेक मंडळ विकास मंडळ पुणे प्रथम आवृत्ती
- डहाळे वसंत आबाजी २०११. मराठी समीक्षेची सद्यस्थिती पॉप्युलर प्रकाशन
जोशी लक्ष्मनशास्त्री (सेवा) १९८५ मराठी विश्वकोश खंड १८
महाराष्ट्र राज्य मराठी शब्दकोश निर्मिती मंडळ मुबई.